ऑनलाइन लोकमत मुंबई,दि.7 - दुबईहून विदेशी मद्याच्या बॉक्समधून सोने आयात करुन आणणाऱ्या सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करुन ९५ लाख रुपये किमंतीचे सोने जप्त केले. विपूलकुमार नथूभाई (वय ३३, रा सुरत ,गुजरात) असे त्याचे नाव असून हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली.
दुबईहून इमिरेटस ( ईके ५००) या फ्लाईटने मुुंबईला येत असलेल्या नथूभाई सोन्याची स्मगलिग करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. विमानतळावर त्याच्या साहित्याची झडती घेतली असता त्याच्याकडे प्रत्येकी दहा तोळे वजनाची सोन्याची २७ बार मिळाले. त्याचे एकुण वजन ३ किलो १३२ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ९५ लाख इतकी होते. विपुलकुमारने सोन्याच्या पट्ट्या एका काळ्या रंगाच्या टेपने गुंडाळून ‘जीम बीम’या विदेशी मद्याच्या कंपनीच्या बॉक्समध्ये ठेवले होते. दारुच्या बॉक्सवर ड्युटी फ्रीचा शिक्का होता, गुजरातमध्ये व्यापाऱ्याकडे तो हे सोने पोहचविणार होता, त्याच्याकडून याबाबत आणखी माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.