तिसरी पिढी : दिसत नसल्याने मुलगा घडवितोय वारीपुणे : चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या... दृष्टी धुसर झालेली... शरीरयष्टी थकलेली... वयाची ९६ वर्षे उलटलेली तरही पायी वारी करण्याचा तरूणांना लाजवेल असा उत्साह... या आहेत परभणी जिल्हयातील अनुसया त्र्यंबक मुंढे! गेल्या ८० वर्षापासून त्या अथक वारी करीत आहेत. घराण्याची परंपरा कायम राखत आईला या उतार वयात वारीत त्यांचा मुलगा विठ्ठल मुंडे घेऊन जात आहे.मुंढे या परभणी जिल्हयातील बडवणी गावच्या. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी वारकरी संप्रदायातील कुटुंबात लग्न झाल. पती वारकरी. नित्यनियमाने वारी करणारे. सासरेही नित्यनियमाने वारी करणारे. त्यांच्यामुळे अनुसया बार्इंनाही वारीची गोडी लागली आणि वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासून त्याही पतीबरोबर वारी करू लागल्या. वय वाढत गेल. ४ मुले झाली पण वारी कधी सोडली नाही. आज त्यांचे वय ९६ वर्षे झाले आहे. तरीही त्या थकलेल्या नाहीत. आजही त्या पायी वारी करीत आहेत. दृष्टी धुसर झाल्याने एकटयाला जाता येत नाही. त्यात पतीचे निधन झाल्याने वारीची परंपरा पुढे त्यांचा छोटा मुलगा लक्ष्मण चालवित आहेत. आई आणि मुलगा दोघे यावर्षीही वारीत सहभागी झाले आहेत. समोर कोणीही आले आणि बोलायला सुरूवात केली की माय-लेकांच्या तोंडून पहिल्यांदा माऊलींचे नाव निघते. त्यानंतर आपुलकीने बोलणे हा त्यांचा स्वभाव.आपल्या वारीबाबत अनुसया मुंढे म्हणतात, लहानपणी लग्न झाल... वय निटस आठवत नाही... पतीच्या घरात वारीची अखंड सेवा होती. माझे सासरे वारी करीत. त्यामुळे मलाही वारीची गोडी लागली. गेल्या अनेक वर्षांपासून मी वारी करतीये. सासरे गेल्यानंतर वारीची पताका माझ्या पतींनी संभाळली. पतीही गेले. आता वारीची ही पताका माझा लहान मुलगा संभाळत आहे. तोही लहानपणापासून आमच्याबरोबर वारीत येतो. आता मला निट दिसत नाही. पण मुलगा सोबत असल्याने आजही मी वारीचे सुख अनुभवत आहे.
९६ वर्षाच्या आज्जींची ८० वर्षे अथक वारी
By admin | Published: June 29, 2016 9:40 PM