ऑनलाइन लोकमत/राज चिंचणकर
मुंबई, दि. 21 - ९७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन उस्मानाबाद येथे ७ ते ९ एप्रिल या कालावधित होणार आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषदेने शनिवारी यावर शिक्कामोर्तब केले. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी याआधीच निवड झाली आहे. या संमेलनाचे यजमानपद मिळावे यासाठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर आदी पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच उस्मानाबादला भेट देऊन संमेलनस्थळाची पाहणी केली होती. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणारे नाट्यसंमेलन घेण्यासाठी यंदा एप्रिल उजाडला आहे. आधी नोटाबंदी आणि त्यानंतर फेब्रुवारीत राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडल्याचे नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी स्पष्ट केले.
‘लोकमत’चे वृत्त अचूक ठरले
अ. भा. नाट्यसंमेलन आयोजित करण्यासाठी उस्मानाबादव्यतिरिक्त नागपूर व जळगाव शाखांकडूनही प्रस्ताव आले होते. मात्र उस्मानाबादचे नाव पहिल्यापासूनच आघाडीवर होते. हे संमेलन उस्मानाबाद येथे होणार असल्याचे 'लोकमत'ने २९ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या अंकात दिलेले वृत्त अचूक ठरले आहे.