वर्धा : फळे पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडचा स्फोटक म्हणूनही वापर होतो. ही बाब पुणे बॉम्बस्फोटात सिद्ध झाली आहे. हिंगणघाट येथे सोमवारी तर पुलगाव येथे मंगळवारी कारवाई करीत ९६ किलो कॅल्शियम कार्बाईड दहशतवादविरोधी पथकाने जप्त केले. या प्रकरणात एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.पुलगाव येथील एका दुकानात कॅल्शियम कार्बाईड हा ज्वलनशील पदार्थ विकला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी मंगळवारी दुकानाची झडती घेत ड्रमसह २१ किलो कॅल्शियम कार्बाईड जप्त केले. रेल्वेस्थानक ते नाचणगाव मार्गावरील सैफी मशिनरी अॅण्ड हार्डवेअर या दुकानात कॅल्शियम कार्बाईड विकले जात असल्याची माहिती मिळाली. दुकान मालक अली असगर हकीमुद्दीन सैफी व दोन पंचांसह दुकानाची झडती घेण्यात आली. यात दुकानाच्या पुढील बाजूला एका टीनाच्या ड्रममध्ये कॅल्शियम कार्बाईड आढळून आले. त्याचे वजन केले असता ड्रमसह २१ किलो २१५ ग्रॅम साठा आढळला. हा ज्वालाग्रही पदार्थ सैफी अवैधरीत्या तसेच निष्काळजीपणे विकत असल्याचेही निष्पन्न झाले. ड्रमच्या बाजूलाच कॉम्प्युटर, प्रिंटर, लाईट होता. कुठलीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. यामुळे जीवितास तसेच मालमत्तेस धोका होता. यावरून कॅल्शियम कार्बाईडचा साठा जप्त करून आरोपी दुकानमालक अली असगर हकीमुद्दीन सैफी (२८) रा. बोहरा गल्ली राठी मार्केट पुलगाव यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. (प्रतिनिधी)
वर्धा जिल्ह्यात ९६ किलो कॅल्शियम कार्बाईड जप्त
By admin | Published: March 24, 2016 2:05 AM