ऑनलाइन लोकमतउमरगा, दि. 22 : येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या घरातून शुक्रवारी दुपारी एम़एच़चे २० काडतूस आणि रोख १२ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले होते़ या चोरी प्रकरणातील ०९ काडतुसे ही शहरातील बालाजी नगर भागातील चार मुलांकडून हस्तगत करण्यात आली असून, मुलांना ज्या कचरा वेचणाऱ्या मुलांनी काडतुसे दिली त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे़उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि भिकुलाल वालचंद वडदे हे बालाजीनगर येथील रवींद्र येवते यांच्या घरी राहतात.
वडदे हे शुक्रवारी दुपारी उस्मानाबादकडे गेले होते़ त्यांचे घर चोरट्यांनी फोडून कुलूप तोडून आतील रोख रक्कमेसह एम़एच़चे २० काडतूस लंपास केले होते़ या प्रकरणी वडदे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, शहरातील बालाजी नगर भागातील काही मुले काडतुसांशी खेळत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली़ या माहितीवरून पोलिसांनी त्या मुलांकडून ०९ काडतुसे रविवारी जप्त केली़ मुलांकडे अधिक चौकशी केल्यानंतर कचरा गोळा करणाऱ्या मुलांनी ही काडतुसे खेळण्यासाठी म्हणून दिल्याचे सांगण्यात आले़ पोलिसांनी आता कचरा वेचणाऱ्या मुलांचा शोध सुरू केला असून, ही काडतुसे चोरट्यांनी कचऱ्यात फेकली की कचरा गोळा करणाऱ्या मुलांनीच चोरी केली याचा शोध पोलीस घेत आहेत़पोलिसांनी रविवारी उस्मानाबाद येथून श्वान पथकालाही पाचरण केले होते़ मात्र, श्वान पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्याच आवारात घुटमळले़ त्यामुळे चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याचा कायास पोलिसांनी बांधला असून, या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा राहिले आहे़