पुणे : दिल्लीकडे जाणाऱ्या स्पाइस जेट कंपनीच्या विमानाच्या कॉकपिटच्या काचेला तडा गेल्याने लोहगाव विमानतळावर प्रवाशांचा तब्बल नऊ तास खोळंबा झाला. सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी दिल्लीकडे रवाना होणाऱ्या या विमानाची काच बदलल्यानंतर दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी विमानाने उड्डाण केले. या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.लोहगाव विमानतळावरून रोज सकाळी ७.२० वाजता स्पाइस जेट कंपनीचे विमान दिल्लीकडे रवाना होते. बुधवारी सकाळी उड्डाण करण्यापूर्वी कॉकपीटच्या समोरच्या बाजुच्या काचेला तडा गेल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे ३५ उद्योजकांसह सुमारे १५० प्रवाशांना खाली उतरवून विमानतळावरील प्रतिक्षा कक्षात थांबविण्यात आले. तांत्रिक कारणामुळे विलंब होणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. सुरुवातीला १०.३० वाजता, त्यानंतर साडेबारा वाजता विमानाचे उड्डाण होईल, असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही बराच वेळ कंपनीकडून काहीही घोषणा करण्यात आली नाही.विमान सुटण्याच्या वेळेवरून प्रवासी व कंपनीची प्रतिनिधींमध्ये वादावादी झाली. काही प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास दुसरे विमान उपलब्ध करून देण्यात आले, असे या विमानातील प्रवासी उद्योजक शेखर खाकुर्डीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काचेला तडा बुधवारी उड्डाण करण्यापूर्वी कॉकपीटच्या समोरच्या बाजुच्या काचेला तडा गेल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सुमारे १५० प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते.
पुण्यातील विमानतळावर प्रवाशांचा ९ तास खोळंबा
By admin | Published: February 23, 2017 4:05 AM