पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अनेक आंदोलनांची साक्षीदार असलेल्या स्कार्पिओ वाहनाच्या लिलावाची उत्सुकता रविवारी संपली. देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील दूध व्यावसायिक अतुल लोखंडे यांनी ९ लाख ११ हजार रुपयांना बोली लावत लिलावात अण्णांची गाडी खरेदी केली.माहितीचा अधिकार कायदा, दारूबंदी चळवळ, ग्रामसभेला कायद्याने अधिकार, दिल्लीतील लोकपाल आंदोलनांची साक्षीदार असलेली स्कार्पिओ गाडी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रविवारी स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्टने लिलावात काढली. राळेगणसिद्धीत ट्रस्टचे सचिव दगडू मापारी यांनी त्याचे सरकारी मूल्यांकन ४ लाख रुपये असल्याचे सांगितले. श्रीगोंद्याचे भरत नाहाटा यांनी ९ लाखांपर्यंत लिलाव नेल्यावर देवदैठणचे अतुल लोखंडे यांनी ९ लाख ११ हजार रुपये बोली लावली. अण्णांनी अतुल लोखंडे यांना वाहनाची चावी दिली. माझे आजोळ राळेगणसिद्धीचेच व मी संत निळोबाराय विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्यांच्या चळवळीत असल्याने अण्णांच्या वाहनाचे पावित्र्य राखणार असल्याचे अतुल लोखंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अण्णांच्या गाडीला ९ लाखांची बोली
By admin | Published: May 18, 2015 3:58 AM