अजित पवारांसोबत 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार; बैठकीला हे होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 02:02 PM2023-07-02T14:02:12+5:302023-07-02T14:02:41+5:30
Ajit Pawar NCP News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेतेपद नको तर प्रदेशाध्यक्ष पद द्या अशी मागणी केली होती.
भाजपा, शिवसेनेला कोंडी पकडण्यासाठी महाविकास आघाडीकडून एकत्र निवडणूक लढविण्याच्या मनसुब्यांना मोठा सुरुंग लागला आहे. राज्यात राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला असून अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर अजित पवार यांच्यासोबत असलेले ९ आमदारही मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेतेपद नको तर प्रदेशाध्यक्ष पद द्या अशी मागणी केली होती. यासाठी १ जुलैपर्यंतचा अल्टीमेटम दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत.
आज अजित पवार यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक झाली. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी आमदार उपस्थित होते.
राष्ट्रलवादीच्या जवळपास तीस आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते आहे. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ३० आमदार अजित पवारांच्या बाजुने आले आहेत. राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासाठी शिंदे सरकारमधील मंत्री पोहोचू लागले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत पोहोचू लागले आहेत.