मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील एका मेडिकल स्टोअरला गुरुवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच चिमुरड्यांचा समावेश आहे. यामध्ये अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुहू गल्लीतील वफा मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्सला सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. या आगीने तळमजल्यावरील दुकानाबरोबरच पहिल्या मजल्यावरील घराला कवेत घेतले होते. यात सबुरिया मोझीम खान (५२), सिद्दिक खान (३५), राबील खान (२८), मोझेफ खान (८), उन्नी हाय खान (५), अलीजा खान (४), सुभा खान (३), अलतान खान (३ महिने), साबिया खान (२८) यांचा मृत्यू झाला.पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दुकानाच्या आतून जिना होता आणि आग लागली तेव्हा दुकानाचे शटर बाहेरून बंद होते. त्यामुळे वर घरात असलेले आतमध्येच अडकून पडले. अग्निशमन दलाने तीन फायर इंजिनांच्या मदतीने ही आग तासाभरात आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने पहिल्या मजल्यावरील नऊ जखमींना सिमेंटचे पत्रे तोडून शिडीच्या मदतीने बाहेर काढले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोपरेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे जवान अविनाश कृष्णा शिरगावकर हेदेखील जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>सकाळी ८.३०पर्यंत ९ जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सात जणांचा वाटेतच मृत्यू झाला होता. तर एकाचा मृत्यू रुग्णालयात दाखल केल्यावर झाला. साबिया खान हिला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. - डॉ. अविनाश सुपे, संचालक, महापालिका प्रमुख रुग्णालये
मेडिकल स्टोअरच्या आगीत ९ जणांचा मृत्यू
By admin | Published: July 01, 2016 6:15 AM