ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी 9 ‘डुलकी’बाज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. शनिवारी रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले 9 कर्मचारी भरारी पथकाला झोपलेले आढळून आले. या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले.
एकूण 13 डेपो शहरात असून रात्रीच्या वेळेत झोपणाऱ्या कर्माचाऱ्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते. त्याकरता चार कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले होते. काल या भरारी पथकाला कोथरुड आणि पुणे स्टेशन आगारातील 9 कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्यामध्ये 2 बसचे चालक असून 9 कर्मचारी हे गाडयांची दुरूस्ती करणाऱ्या वर्कशॉपमधील आहेत. या 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
2 दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी कार्यालयात उशिरा आलेल्या 117 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत एक दिवसाचा पगार कापला होता. नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची पुणे महापालिकेच्या परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुंढे यांनी 29 मार्चला पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकाराताच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते.