मुंबई : तू फार बारीक आहेस... इतके जाड कुणी असते का?.. तुला वजन करण्याची गरज आहे, अशा एकना अनेक स्वरूपाच्या बॉडीशेमिंगला मेट्रो शहरांतील ९० टक्के महिलांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव एका अभ्यास अहवालातून समोर आले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे ४७.५ टक्के महिलांना आपल्या कार्यालयात आणि शाळेच्या आवारात या बॉडीशेमिंगला बळी जावे लागत आहे. ९० टक्के महिलांनी बॉडीशेमिंग हे दुर्दैवाने सामान्य वर्तन झाल्याचे म्हटले आहे.
एका संस्थेने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अमृतसर, लुधियाना, मोहाली आणि जालंधर या शहरांतील १५ ते ६५ वयोगटातील १ हजार २४४ महिलांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, या अहवालात महिला व तरुणींनी बॉडीशेमिंगविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरयष्टीची खिल्ली उडवत असल्याचे ८४ टक्के महिला व तरुणींनी म्हटले आहे. तर ३२.५ जणींनी मित्रपरिवारही देहयष्टी, वजन, आकार, केस आणि त्वचेविषयी टीका करत असल्याचे म्हटले आहे.
या अहवालातील आणखी एक धक्कादायक वास्तव म्हणजे, ७६ टक्के जणींनी प्रसारमाध्यमात केवळ व्यवसायवृद्धीसाठी सौंदर्य प्रसाधनांचा मांडलेला बाजार हा बॉडीशेमिंगसाठी दोषी असल्याचे म्हटले आहे. केवळ २८ टक्के महिला व तरुणीआपल्या शरीराविषयी होणाऱ्या टिप्पणीविषयी आवाज उठवित असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. यातील ९७ टक्के तरुणी व महिलांनी बॉडीशेमिंगविषयी शालेय शिक्षणात शिकविले पाहिजे, असे आग्रहाने म्हटले आहे.
‘दोष मानसिकतेचा नसून ती घडविणाऱ्यांचा’च्मानसोपचारतज्ज्ञ डॉ. समीर पारीख यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत बॉडीशेमिंगविषयीच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून आले आहे. मात्र यात दोष केवळ मानसिकतेचा नसून ती मानसिकता घडविणाऱ्यांचाही आहे.शिवाय, सुंदर म्हणजे गोरेपणा वगैरेच्या व्याख्या साफ चुकीच्या आहेत, यात प्रसार माध्यमांचाही दोष तितकाच आहे. हे चित्र बदलण्यासाठी घरापासून शाळेपर्यंत जनजागृती होणे गरजेचे आहे