मुंबई : तपासकामाच्या दृष्टीने आवश्यक असलेली इंग्रजी भाषा व संगणकीय कौशल्याचा अभाव असतानाही गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत (ईओडब्ल्यू) कार्यरत असलेल्या तब्बल ९२ पोलिसांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्याऐवजी इच्छुक असलेल्या १०४ जणांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात विविध बँका, वित्तीय संस्थांशी पत्रव्यवहार करावा लागतो, त्यातील बहुतांश कागदपत्रे ही इंग्रजीत असल्याने त्याची जाण, संगणकीय कौशल्य असणाऱ्यांना शाखेत ठेवण्याचा निर्णय सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी घेतला. त्यानुसार सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा अहवाल तपासण्यात आला. तेव्हा त्यातील ९२ जणांना इंग्रजी भाषा व संगणकाबद्दल फारसे ज्ञान अवगत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या शहर व उपनगरांतील विविध पोलीस ठाणे व शाखेत बदल्या केल्या. (प्रतिनिधी)
आर्थिक गुन्हे शाखेतील ९२ पोलिसांच्या बदल्या
By admin | Published: September 11, 2015 3:10 AM