मुंबई-
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यातच महाराष्ट्रातील आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चिंतादायक गोष्ट म्हणजे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४,४८७ इतकी झाली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ४२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्याचा रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९८.१२ टक्के इतकं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आली आहे. तर केंद्रीय आरोग्य सचिवालयानंही राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे देशातील रुग्णांची संख्या ६ हजाराच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा आज आढळून आलेले रुग्ण १३ टक्क्यांनी अधिक आहेत. तर देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा २८ हजाराच्या वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला कोरोना रुग्णांची संख्या ६,२९८ होती. आजची आकडेवारी गेल्या २०३ दिवसांपेक्षा अधिक आहे.