ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या साथींनी पुण्यात हैदोस घातला आहे. चिंताजनक बाब म्हणजे यंदाच्या वर्षी राज्यात आढळलेल्या चिकुनगुनियाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल 96 टक्के रुग्ण हे एकट्या पुणे जिल्ह्यातील असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
गेल्या शनिवारपर्यंत राज्यात चिकुनगुनियाचे एकूण 1 हजार 520 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल 1 हजार 461 रुण्यांची नोंद ही एकट्या पुणे जिल्ह्यात झाली आहे. पुणे शहरामध्ये 1 हजार 225 तर पुणे ग्रामीणमध्ये 212 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी-चिंचवड पालिका विभागामध्ये चिकूनगुनियाच्या 24 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
तसेच यावर्षी राज्यामध्ये एकूण 5 हजार 137 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तसेच या काळात एकूण 16 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या अहवालामध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या केवळ सरकारी रुग्णालयातील रुग्णांची नोंद आहे. खाजगी रुग्णालयातील रुग्णांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. राज्याच्याच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात डेंग्यूचे प्रमाण अधिक आढळले आहे. या वर्षात राज्यातील ग्रामीण भागामध्ये डेंग्यूचे 1 हजार 614 रुग्ण आढळले असून, डेंग्यूमुळे आठ जण दगावले आहेत. तर शहरी भागात 3 हजार 523 रुगण् आढळले असून, 8 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाच्या संयुक्त निर्देशिका कांचन जगताप यांनी दिली आहे. तसेच डेंग्यूमुळे सर्वाधिक तीन मृत्यू नाशिक मनपा क्षेत्राता झाले आहेत. मुंबई आणि कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत.