ठाणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत घेतली जात आहे. इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी ठाणे जिल्ह्यातील ९६ हजार १८१ परीक्षार्थी असून १४८ केंद्रांवर त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील या परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणासह प्राथमिक विभाग आणि निरंतर शिक्षण विभाग आदी तीन भरारी पथके तैनात केली आहेत. केंद्रात व परिसरातील हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवलेला आहे. चोख पोलीस बंदोबस्त प्रत्येक परीक्षा केंद्रावर तैनात केला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या प्रत्येक शाखेला इंग्रजी विषय सक्तीचा आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९६ हजार १८१ परीक्षार्थी या पहिल्या पेपरला बसले आहेत.यासाठी जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू केला असून तो २ एप्रिलपर्यंत अमलात राहणार आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनावश्यक लोकांची गर्दी होऊ दिली जाणार नाही. या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ आदी ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. परिसरात वापरण्यात येणारे मोबाइल फोन, डिजिटल डायरी, पेजर, लॅपटॉप, आयपॉड, मायक्र ोफोन इत्यादी साधनांच्या वापरामुळेही गैरप्रकारांची शक्यता नाकारता येत नाही. यास आळा घालण्यासाठी आणि केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने हा आदेश ठाणे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे, मुख्य व उपकेंद्रांच्या सभोवतालच्या परिसरात लागू केला आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या पेपरला ९६,१८१ परीक्षार्थी
By admin | Published: February 28, 2017 3:20 AM