मुंबई : अनेक नाटकांनी समाजजागृतीचे काम केले आहे. त्यांनीही इतिहास घडविला आहे. त्याचे स्मरण म्हणून मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन उभारले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.मुलुंड येथे बुधवारपासून सुरू असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक समारोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, स्वागताध्यक्ष विनोद तावडे, प्रसाद कांबळी आदी उपस्थित होते. या सोहळ्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.कोणताही कलाकृती कालबाह्य होत नाही. नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही आणि थिएटरपेक्षा नाटके चांगली व्हायला हवीत, असे त्यांनी सुचविले. कलेचा आनंद घेण्याची वृत्ती आपण हरवून बसलो आहोत. तो आनंद देण्याचे काम रंगकर्मी करतात, अशा शब्दांत त्यांनी रंगकर्मींचा गौरव केला.यंदा ६० तास संमेलन चालवण्याचा प्रयोग करण्यात आला. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वच वक्त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली जाते. प्रत्यक्षात लाखो लोकांसमोर आम्हीही अभिनय करत असतो. त्यामुळे आमच्यातील त्या नटाला तरी हे व्यासपीठ नाकारू नका, अशी टोलेबाजी शिंदे यांनी केली.तेव्हाही मीच मंत्री!सांगता झालेले नाट्यसंमेलन ९८वे आहे. दोन वर्षांनी शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन होईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असला, तर तेव्हाही कदाचित मीच सांस्कृतिक कार्यमंत्री असेन, अशी कोपरखळी विनोद तावडे यांनी मारली. त्यावर थेट भाष्य न करता मराठी माणूस म्हणून एकत्र या, असा सल्ला उद्धव यांनी आपल्या भाषणात दिला.थक्क करणारे नाट्यसंमेलनसंमेलनाध्यक्षी कीर्ती शिलेदार यांनीही संमेलनातील आपल्या अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या. हे नाट्यसंमेलन थक्क करणारे होते, असे सांगून स्वागताध्यक्ष तावडे म्हणाले, विद्या पटवर्धन यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला. त्यांची तब्येत सध्या बरी नाही. यापुढे त्यांची जबाबदारी राज्य सरकारची असेल. सलग साठ तासांच्या संमेलनाला मध्यरात्री प्रेक्षक मध्यरात्री येतील का, याबद्दल शंका होत्या. मात्र, प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले.
रंगभूमीच्या इतिहासाचे दालन मुंबईत उभारणार - ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 7:04 AM