मुंबई : हवामानातील बदलामुळे स्वाइन फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.बदलते हवामान आणि त्यामुळे होणाऱ्या विषाणूंचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी केले आहे.राज्यात ठिकठिकाणी स्वाइन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर करायच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसेच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठविण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाइन फ्लूबाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचे डेथ आॅडिट रिपोर्ट प्राप्त होत आहेत. त्यानुसार औषधोपचारास विलंब हे मृत्यूचे एक प्रमुख कारण आढळून येत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, घसादुखी २४ तासांत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लू गोळ्यांचा डोस सुरू करावा. कुठल्याही परिस्थितीत आजार अंगावर काढू नका. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.उपचार वेळेत सुरू न केल्याने मृतांची संख्या वाढलीहवामानात बदल झाल्याने आजार बळावतात. मात्र, काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या औषध घेऊन आजार अंगावर काढला आहे. स्वाइन फ्लूवरील उपचार वेळेत सुरू न केल्याने मृतांची संख्या वाढली असल्याची माहितीही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या वेळी दिली.
राज्यात हवामान बदलामुळे नऊ महिन्यांत १९९ बळी; स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:21 AM