ऑनलाइन लोकमतठाणे, दि.3 - ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी १ हजार ६० पैकी १ हजार ५७ नगरसेवकांनी (९९.७२ टक्के) शुक्रवारी मतदान केले. उल्हासनगर, अंबरनाथ आणि वसईतील प्रत्येकी एक नगरसेवक वेगवेगळ्या कारणाने मतदानास गैरहजर राहिले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वसंत डावखरे आणि शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक रिंगणात आहेत. उल्हासनगर काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे अमेरिकेला असल्याने गैरहजर होत्या. अंबरनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक सुरेंद्र यादव एका गुन्ह्यात फरार आहे. वसई-विरार शहर विकास आघाडीचे एक नगरसेवक अमेरिकेत असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. उल्हासनगरला गैरहजर नगरसेविका वगळता ७९ पैकी ७८ नगरसेवकांनी मतदान केले. अंबरनाथला फरार नगरसेवक वगळता ११४ पैकी ११३ नगरसेवकांनी मतदान केले. वसई-विरारमध्येही १२० नगरसेवकांपैकी ११९ जणांनी मतदान केले. ठाण्यात १०० टक्के म्हणजे १३३ जणांनी मतदान केले. डहाणू मतदान केंद्रांवर २५, पालघर तहसीलदार कार्यालयात ९६, शहापूरला १९ नगरसेवकांनी, तर मुरबाड १९ नगरसेवकांनी मतदान केले. भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात १९, कल्याणमध्ये १२७ जणांनी, भार्इंदरला ९८ जणांनी, तर नवी मुंबईत ११६ जणांनी मतदान केले. या सर्व ठिकाणी १०० टक्के मतदान झाले. मतदान केलेल्या नगरसेवकांत ५३८ स्त्रिया, तर ५१९ पुरुषांचा समावेश होता.
विधान परिषदेसाठी ९९.७२ टक्के मतदान
By admin | Published: June 03, 2016 9:52 PM