राम शिनगारेछत्रपती संभाजीनगर : आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली असताना, अनेक पालकांमध्ये पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतची शाळा सकाळी ९ नंतर भरविण्याच्या शासन निर्णयाची चिंता वाढली आहे. सकाळी लवकर शाळा असल्यास मुलांना तेथे सोडून नोकरीला जाता येई. आता मात्र वेळेचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील पालक, शाळा चालकांना पडला आहे. त्यामुळे आम्ही हा आदेश पाळणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या उद्घाटनावेळी राज्यपालांनी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करावा, असे म्हटले होते. त्यावर शिक्षण विभागाने परिपत्रक काढून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरविण्याचा निर्णय घेतला. अनेक कुटुंबांतील पती-पत्नी नोकरी करतात. नोकरीला जाण्यापूर्वी ते मुलांच्या शाळेची व्यवस्था करतात. मुलगा शाळेतून आल्यानंतरही त्यांच्या जेवणापासून इतर सर्व व्यवस्था केली असते. आता नव्या निर्णयामुळे मुलांना शाळेत सोडणे व नोकरीला जाण्याची वेळ एकच होऊ लागली आहे. त्याचा फटका प्रत्येकाला बसणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील शाळा चालकांसह पालकांनी पूर्वीच्या वेळाच कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्याविषयीचा पत्रव्यवहारही शालेय शिक्षण विभागाशी केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण विभागाने सकाळी ९ वाजल्यानंतर शाळा भरविण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची झोप होत नसल्याचे दिलेले कारणही तकलादू आहे. पालकांनीच विद्यार्थ्यांच्या झोपेची काळजी घेतली पाहिजे. रात्री उशिरापर्यंत न जागता लवकरच झोपून लवकर उठणे, ही आपली पद्धत आहे. आम्ही पूर्वीच्या वेळाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. -प्रल्हाद शिंदे, संस्थापक, इंग्रजी शाळा महासंघ, छत्रपती संभाजीनगर
शासनाने घेतलेला निर्णय अतिशय गुंतागुंतीचा आहे. मुलांची झोप तर झालीच पाहिजे. त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, शाळांमधील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पालकांची नोकरी अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील पालक संघाने याबाबत निर्णय घेतला पाहिजे. पालक संघाला वेळा ठरविण्याचे अधिकार शासनाने द्यावेत. त्यातून सर्वच प्रश्न सुटतील. -डॉ. श्रीरंग देशपांडे, शिक्षणतज्ज्ञ व सरचिटणीस, स. भु. शिक्षण संस्था
भाऊ लवकर जाणार, बहीण उशिरा येणारछत्रपती संभाजीनगरमधील प्राथमिक ते माध्यमिकच्या बहुतांश शाळांच्या वेळा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ७ वाजल्यापासून बस घेऊन येतात. अनेक कुटुंबातील भाऊ सहावी, सातवी, आठवीला तर बहीण चौथीच्या खालील वर्गात आहे. बहीण-भाऊ एकाच बसमधून शाळेत जातात. नव्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास बहिणीला उशिरा शाळेत यावे लागेल. तेव्हा वाहतूक व्यवस्था कशी करणार, असा सवाल आहे.