मुंबई : भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली... भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले अशा बातम्या नेहमीच चर्चेत असतात. मात्र मुंबई मालाडस्थित ‘अॅनिमल्स मॅटर टू मी’ ही संस्था पहिल्यांदाच तब्बल १२०० भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या या वाढदिवसाच्या सेलीब्रेशन पार्टीत सामान्यांनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईतील गुजराती कुटुंबातील एका नववीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस आहे. याच कुटुंबाच्या इच्छेनुसार, त्या मुलीच्या वाढदिवासाकरिता वापरले जाणारे पैसे विधायक उपक्रमासाठी वापरावे या विचारातून हा आगळावेगळा वाढदिवसाचा सोहळा पार पडणार आहे. या वाढदिवसाच्या सोहळ्यात कुत्र्यांसाठी विशेष पक्वान्ने आणि काही खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाढदिवसाच्या सोहळ्याचे सामान्यांनाही आमंत्रण असून आजमितीस संस्थेच्या ७० स्वयंसेवकांसह २५० हून अधिक जणांनी येणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय, या वाढदिवसाच्या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, सोहळ्यादरम्यान या कुत्र्यांना दत्तकही घेता येणार आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत मालाडच्या मढ-आयलंड येथे सेलीब्रेट होणार आहे. (प्रतिनिधी)सकारात्मक विचार : या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाविषयी संस्थापक गणेश नायक यांनी सांगितले की, जंगी पार्ट्या करून वाढदिवस साजरा करण्याऐवजी मुक्या जिवांचा आधार होणे हा विचार सकारात्मक आहे. त्यामुळे संस्थेनेही कुुटुंबाच्या इच्छेचा विचार करून या उपक्रमाची आखणी केली आहे. अशा प्रकारे वाढदिवस अथवा अन्यही उपक्रम साजरे करण्यासाठी सामान्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
९ सप्टेंबरला १२०० भटक्या कुत्र्यांचा बर्थडे
By admin | Published: September 03, 2016 2:05 AM