मालेगाव - बिबट्याला समोर पाहताच भल्याभल्यांची गाळण उडते. मात्र, १३ वर्षीय बालकाने प्रसंगावधान राखत समोर आलेल्या बिबट्यापासून स्वतःची सुखरूप सुटका करवून तर घेतलीच, शिवाय बिबट्यालाच कोंडून ठेवण्याची धाडसी आणि काळजाचा ठोका चुकविणारी घटना मालेगावातील मंगल कार्यालयाच्या कार्यालयात मंगळवारी (दि. ५) घडली
मालेगाव नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन हॉल आहे. सकाळची वेळ असल्याने सर्व गाळे बंद होते. फक्त कार्यालयच उघडे होते. कार्यालयातील रखवालदार विजय अहिरे यांचा मुलगा मोहित अहिरे (१३) हा मोबाइल पाहत बसलेला होता. याचवेळी अचानक बिबट्या ऑफिसमध्ये शिरला. रोहितने बिबट्याला आत येताना पाहिले; मात्र, यावेळी त्याने संयम बाळगत आरडाओरड न करता सोफ्यावरून उठत प्रसंगावधान राखत कार्यालयाचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर धावत जाऊन त्याने वडिलांना बिबटचा शिरल्याची माहिती दिली. या घटनेने सारेच अवाक् झाले. समोर बिबट्या असतानाही त्याने धाडसाने स्वत:ची सुटका करवून घेतलीच. शिवाय बिबटवाला कोंडून घेण्याचे धारिष्टदेखील दाखविले.
भुलीचे इन्जेक्शन अन् बिबट्या बेशुद्धनाशिक येथील रेस्क्यु पथकाचे डॉ. मनोहर नागरे, वैभव उगले यांच्यासह मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पैभव हिरे, अग्निशमन दलाचे संजय पवार यांनी कार्यालयातील बंद दरवाजाबाहेर पिंजरा असलेले वाहन उभे केले. उघड्या खिडकीतून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध नर बिबट्याला पिंजऱ्यामध्ये ठेवले.