Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनात शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गायीला 'राज्यमाता' घोषित केले आहे. या ऐतिहासिक पाऊलाबाबत सरकारने आदेशही जारी केला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सरकारने सांगितल्यानुसार, वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गाईचे स्थान, मानवी आहारात गाईच्या दुधाची उपयुक्तता, आयुर्वेद औषध, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये गायीचे शेण व गोमूत्राचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अशाप्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र दुसरे राज्य बनले आहे.
दरम्यान, सनातन धर्मात गायीला माता मानले जाते. तसेच या धर्मात गायीची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार गाईंमध्ये देवदेवता वास करतात. गेल्या काही काळापासून अनेक हिंदू संघटनांकडून गायीला राज्याच्या मातेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. हा सर्व विचार करुन आता सरकारने गायीला राज्य मातेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.
गायीला राजमाता घोषित करणारे उत्तराखंड हे पहिले राज्यगायीला "राजमाता" किंवा "राष्ट्रमाता" म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड विधानसभेने 19 सप्टेंबर 2018 रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. आता महाराष्ट्राच्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे.
भारतात गायीचे महत्त्वभारतात अनेक प्राणी आणि पक्ष्यांची पूजा केली जाते आणि त्यांना हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाचा संबंध गायीशी आहे. गाईला पवित्र मानण्यासोबतच दूध, मूत्र आणि शेणही पवित्र मानले जाते. गाईचे दूध मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, तर गोमूत्रामुळे अनेक आजार बरे होतात असा दावा केला जातो. याशिवाय आयुर्वेदात असे सांगितले आहे की, मुलांना गायीचे दूध पाजल्याने त्यांचा विकास होतो आणि मुलांचा स्वभाव शांत राहतो. याशिवाय हिंदू धर्मात गायीला देवी-देवतांच्या समतुल्य मानले जाते.
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची टीम 28 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय दौऱ्यावर महाराष्ट्रात पोहोचली होती. दोन दिवसांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाच्या पथकाने अनेक राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने 26 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात निवडणुका घ्याव्या लागतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.