जयदेव वानखडे
जळगाव जामोद, (बुलढाणा) : जूनमध्ये कमी जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस तर सप्टेंबर मध्येही भरपूर पाऊस पडेल. त्याचबरोबर अवकाळी पावसाच्या थैमानाने यावर्षी पिकांची हानी होईल तर परिस्थिती साधारण राहील, असे भाकीत भेंडवळ घटमांडणीच्या निष्कर्षावरून आज ११ मे रोजी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केले.
भावात तेजी-मंदी राहील. पृथ्वीवर संकटे नाहीत. तसेच भारताचे संरक्षण व्यवस्था मजबूत राहून शत्रूंच्या कुठल्याही कारवाया यावर्षी होणार नाहीत. देशाची आर्थिक परिस्थिती ही मजबूत असेल. चाराटंचाई जाणवणार नाही,असं भाकीत सांगण्यात आलं आहे
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या ग्राम भेंडवळ येथील घट मांडणी व भाकीताचं तीनशे वर्षांची परंपरा आहे. गुढीपाडव्याला झालेल्या पाराच्या मांडणीचे अक्षय तृतीयेच्या घट मांडणीशी साधर्म्य आहे. घट मांडणीमध्ये यावर्षी पाण्याची घागर,सांडोळी, कुरडी ,भजा, वडा ,पापड, पुरी आणि पानसुपारी हे सर्व कायम असल्याने सर्व काही ऑल बेल असल्याचे पुंजाजी महाराजांनी सांगितले. या घट मांडणीला पंचक्रोशीतील तथा विदर्भातून शेतकरी मंडळी आली होती.