महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, संविधानाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेस संविधानाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा समोरा-समोर आले आहेत. राहुल गांधी यांनी नुकतेच 'संविधानाचे पुस्तक' दाखवल्यानंतर, भाजपने काँग्रेसवर 'कोरे संविधान' म्हणत निशाना साधला होता. यानंतर आता, भाजपने एक व्हिडिओ शेअर करत, "नागपुरात राहुल गांधी यांनी कोरं संविधान दाखवून संविधानाचा अवमान केला... आणि मुंबईत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याचं सौजन्यही दाखवायचं नाही. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही," असे लिहीत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात 'भाजपा महाराष्ट्र'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक व्हडिओ शेअर करत लिहिले आहे, "नागपुरात राहुल गांधी यांनी कोरं संविधान दाखवून संविधानाचा अवमान केला तर मुंबईत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा द्वेष दिसून आला. आधी संविधानाचा अपमान करायचा आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याचं सौजन्यही दाखवायचं नाही. यातून राहुल गांधींची संकुचित वृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील मानसिकता दिसून येते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही."
'भाजपा महाराष्ट्र'चा 'कोरे' संविधान म्हणत राहुल गांधींवर आरोप - तत्पूर्वी, 'भाजपा महाराष्ट्र'ने एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत, 'कोरे' संविधान दाखवत, "संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है, मोहब्बत के नाम पर, सिर्फ नफरत फैलाना है..." असा आरोप राहुल गांधींवर केला होता. तसेच, "काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहुल गांधी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल...," असे म्हटले होते.
निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर... -याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. "एकीकडे घटनेची प्रत उंचावून दाखवायची आणि दुसरीकडे अराजकतावादी शक्तींच्या पाशात अडकायचे. संविधानाचा आग्रह एकीकडे धरायचा आणि दुसरीकडे या संविधानाला मूठमाती देऊ पाहणाऱ्या शक्तींना गोंजारायचे, अशी बेगडी वृत्ती त्यातून दिसते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली असून ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. घटनेची प्रत ते अनेक प्रसंगांमध्ये दाखवतात. नेहमीच्या निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर लावलेले असते. अराजकतावादी आणि अर्बन नक्षलवाद्यांनी राहुल गांधी यांना घेरले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा असे वाटले होते की चला! काही नाही तर भारत जोडायला तरी निघाले आहेत पण प्रत्यक्षात काय घडले? त्यांच्या यात्रेमध्ये १८० संघटना अशा होत्या, ज्या विध्वंसक मानल्या जातात, हे मी म्हणतो म्हणून नाही तर ते रेकॉर्डवर आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.