लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाच राज्यांचे निकाल निराशाजनक आणि वैफल्यग्रस्त करणारे आहेत. परंतु हा निकाल संपूर्ण अनपेक्षित नव्हता. निकालावर प्रदीर्घ चर्चा करणे गरजेचे असून, काँग्रेसला नेतृत्व मिळाले पाहिजे. आम्ही २३ जणांनी पत्रात जे मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर गंभीर चर्चा व्हायला हवी. राजकीय पक्षाला संघटन मजबूत करायला हवे. त्याबाबत काँग्रेस कमी पडली. काँग्रेसने घेतलेले काही निर्णय लोकांना आवडले नाहीत. लोकांनी त्याचा राग काँग्रेसवर काढला, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला.
चव्हाण म्हणाले की, बहुमत मिळूनही गोव्यात मागील वेळी सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून भाजपत गेले. भाजपची ताकद वाढली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नवख्या उमेदवारांना घेऊन निवडणूक लढवावी लागली. पंजाबमध्ये नेतृत्वबदलाच्या घटना घडत गेल्या. जातीय धोरणावर समीकरणे बदलत गेली. जी काँग्रेसच्या मूळ धोरणात नव्हती. काँग्रेस नेतृत्त्वाची जी पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे असे निकाल लागले.
उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी एकट्या लढत होत्या. परंतु पक्षाची ताकद त्यांना मिळाली नाही. इतर २५ राज्यांत काँग्रेस नेते मोकळे होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ४ ते ५ मंत्री, आमदार, खासदार यांना प्रचाराकरिता पाठवायला हवे होते. त्यांनी तीन ते चार महिने तळ ठोकून राहायला हवे होते. पराभूत मानसिकतेतून काँग्रेसने निवडणूक लढवली. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला संधी होती. परंतु त्याठिकाणी हरिश रावत यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले नाही. रावत पक्ष सोडून निघाल्याची चर्चा झाली, याकडे चव्हाणांनी लक्ष वेधले.
आम आदमी पक्ष राष्ट्रीय पर्याय बनेल, असे वाटत नाही, असे नमूद करुन चव्हाण म्हणाले की, दिल्लीत जे काम केले, त्याचा परिणाम पंजाबमध्ये झाला. परंतु दिल्लीत कायदा - सुव्यवस्था केंद्राकडे असते. श्रीमंत राज्य असल्याने महसूल जास्त मिळतो. त्यांनी शिक्षण - आरोग्यावर जास्त खर्च केले. मात्र, पंजाबची परिस्थिती वेगळी आहे. ‘आप’ला त्याठिकाणी जास्त काम करावे लागेल, असेही ते म्हणाले.
पराभवाचे आत्मचिंतन करू : नाना पटोलेnपाच राज्यांतील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याबाबत आम्ही आत्मचिंतन करू आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.nपटोले म्हणाले की, लोकशाहीमध्ये जनतेचा कौल महत्त्वाचा असतो. जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. आम्ही पाचही राज्यांत ताकदीने लढलो. या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जनतेसमोर गेलो.परंतु ते बाजूला पडले. निवडणुकीत हार-जीत होतच असते, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पण, या पराभवाने खचून न जाता जनतेचे मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाऊ.
nउत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुका लढवल्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सात आमदार होते. आम्हाला अपेक्षित निकाल लागला नसला, तरी मतांची टक्केवारी वाढली आहे.nकाँग्रेसचे नेतृत्व कणखर आहे. आमच्या पक्षाचे नेतृत्व कोणी करावे हे काँग्रेसचे कार्यकर्ते ठरवतील, असे पटोले म्हणाले.