तिरोडा (जि. गोंदिया) : राज्यातील महायुती सरकार हे शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळावी, त्यांचे विजेचे बिल माफ व्हावे, कृषी पंपासाठी करावी लागणारी प्रतीक्षा करण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली. गेल्यावर्षी धानाला प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला होता. त्यात यावर्षी वाढ करून २५ हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
तिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन योजना टप्पा-२ या कामाचे भूमिपूजन व जलपूजन कार्यक्रम रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. धानाला २५ हजार रुपये बोनस मिळावा म्हणून तुमचा वकील म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आणि धानाला निश्चितच हेक्टरी २५ हजार बोनस जाहीर करणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे ठरत नाही- महायुती सरकारने लाडकी बहीण व राबविलेल्या इतर योजनांमुळे मविआच्या नेत्यांना पोटदुखी होत आहे. ते या योजना बंद करण्यासाठी धडपड करीत आहेत. - मविआ ही लबाडखोर असून लबाडांचे आवतन जेवल्याशिवाय खरे होत नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. - मविआ सरकारने सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या योजनांना कात्री लावली; पण आम्ही शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक योजना राबवून निधी दिल्याचेही फडणवीस म्हणाले.
दुर्दैवी घटनेतही विरोधकांना खुर्चीचा मोह- अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून आरोपींनी हत्या केली. ही दुर्दैवी घटना आहे. यातील दोन आरोपींना अटक केली असून पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करीत आहेत. - विरोधक माझ्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. यातूनच विरोधकांना किती खुर्चीचा मोह आहे दिसून येते, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.