लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगात हलाल ही संकल्पना हळूहळू फोफावत असून, भारतीय अर्थव्यवस्थेवर ती आक्रमण करू पाहत आहे. हलालचे हे पैसे अतिरेक्यांकडे जात असून, आपण खरेदी केलेला एक बर्गर एका दहशतवाद्याला पोसतोय म्हणूनच हलाल सक्तीविरोधात आपण आवाज उठविणे गरजेचे असून, हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तूंचा बहिष्कार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हलाल सक्तीविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रमेश शिंदे यांच्या ‘हलाल जिहाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका चित्रफितीच्या माध्यमातून आपले विचार मांडले. ते म्हणाले की, ‘हलाल प्रमाणपत्र आता भारतीय अर्थव्यवस्थेत शिरू पाहत आहे. चहा व अशा अनेक वस्तूंवर हलालचा मार्क पाहायला मिळतो. हा मार्क नसेल तर जगभरातील ५० हून अधिक मुस्लिम राष्ट्रात वस्तू निर्यात करता येत नाहीत किंवा विकताही येत नाहीत. त्यामुळे आपण वेळीच सावध व्हायला हवे. या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालायला हवी किंबहूना हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तू खरेदी करू नयेत’.
हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यावेळी म्हणाले की, ‘हलाल हळूहळू भारतात शिरू पाहत आहे. हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तू जगभरात विकल्या जात आहेत. आता तर फॅशन, बांधकाम, सौंदर्य प्रसाधन साधने अशा क्षेत्रांत शिरकाव केला असून, हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तूंची दोन ट्रिलियन इतकी जगभरात अर्थव्यवस्था झाली आहे. त्यामुळे वेळीच आपण सावध व्हायला हवे.’या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर, माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्री, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार, महाराष्ट्र सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष मोतीलाल जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.