मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडूना आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हा पुतळा भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या दुर्घटनेची भारतीय नौदलाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. तसेच हा पुतळा तातडीने पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने नौदलाकडून पावलं उचलण्यात येत आहेत.
दरम्यान, शिवरायांचा पुतळा कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेचं विरोधकांनी भांडवल करू नये, असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आवाहन केलं आहे. तसेच राजकोट येथे १०० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारला जाईल, असं आश्वासन दीपक केसकर यांनी दिलं आहे.