BJP Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची दोनदा भेट घेतल्याने वादंग निर्माण झालं आहे. कारण हेच सुरेश धस मागील काही आठवड्यांपासून कथित भ्रष्टाचारासह विविध मुद्द्यांवरून धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत होते. मात्र आपल्या भेटीबाबत दिशाभूल करण्यात आली असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे.
सुरेश धस यांनी म्हटलं आहे की, "धनंजय मुंडे यांच्याशी माझी दोनदा भेट झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवणासाठी निमंत्रित केलं होतं. बावनकुळे यांनी तिथं मुंडेंनाही बोलावलं होतं. तिथं आमच्यात अर्धा तास चर्चा झाली. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी कसलीही तडजोड करणार नाही, हे मी तेव्हा स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी मीच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलो होतो. कारण डोळ्याचं ऑपरेशन झाल्याने माणुकसकीच्या नात्याने मी भेटायला गेलो. त्यांनी माणुसकी सोडली असली तरी आम्ही माणुसकी दाखवली. पण या भेटीची बातमी मुद्दाम लीक करून माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आलं आहे. हे षडयंत्र कोणी रचलं, याचीही मला माहिती आहे. पुढील एक-दोन दिवसांत ते नाव समोर येईल," असा इशारा धस यांनी दिला आहे.
"पेल्यातील वादळ पेल्यातच शमणार"
धनंजय मुंडे यांच्यासारख्या क्रूर व्यक्तीची भेट घेऊन सुरेश धस यांनी विश्वासघात केला आहे, असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, "मनोज दादा जरांगे पाटील हे आमचं दैवत आहे. कालची ट्विस्टेट बातमी पाहून ते रागाने काही बोलून गेले असतील. पण हे पेल्यातील वादळ आहे आणि पेल्यातच शमेल. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर जरांगे पाटीलही माझ्यासोबत राहतील," असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.