मुंबई - शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस पवारांना पंतप्रधान करून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांना द्यावे, अशी प्रामाणिक सूचना अनेक नेत्यांकडून आली. पण त्यावेळेस राजकारणामध्ये पवारांना कसं मागे टाकायचे, पवारांसारखा पॉवरफुल व्यक्ती जर देशाच्या राजकारणामध्ये स्थापित झाला तर त्याचे परिणाम वेगळे होतील अशी धारणा काही लोकांच्या मनामध्ये होती. त्यामुळे शरद पवारांना बाजूला करण्याचे षडयंत्र रचले गेले. जे १९९१ मध्ये झाले तेच नंतर १९९६ मध्ये देखील झाले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केला.
राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते, यावेळी प्रफुल पटेल म्हणाले की, काँग्रेस पक्षामध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली होती. गांधी घराण्यातील कोणी व्यक्ती त्यावेळेस राजकारणामध्ये नव्हती आणि १९९१ च्या निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये नेतृत्व कोणी करायचं हा एक मोठा प्रश्न होता. त्यावेळी अनेकांनी शरद पवारांचे नाव सुचवले होते. पण पवार देशपातळीवर स्थिरावले तर त्याचे परिणाम वेगळे होतील अशी भीती काहींच्या मनात होती असं त्यांनी सांगितले.
तसेच आज आपला वेगळा पक्ष आहे आणि शरद पवार आपले नेते, आपला स्वाभिमान आहेत. पण एक खंत जी अजितदादांनी देखील सांगितली की इतके मजबूत आणि देश पातळीवर सर्वमान्य नेतृत्व आपल्याकडे असून देखील आपण महाराष्ट्र स्वबळावर कधीच जिंकू शकलो नाही किंवा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकलो नाही. ही आपल्या सर्वांसाठी शोकांतिका आहे असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं.
दरम्यान, १९९९ मध्ये आपला पक्ष स्थापन झाल्यानंतर आपण याच षण्मुखानंद हॉलपासून सुरूवात केली. नंतरच्या पहिल्या निवडणुकीत आपले ५८ आमदार निवडून आले होते. एकूण ९ खासदार होते. स्व. अटल बिहारी वाजपेयीजींनी त्यावेळेस पवार साहेबांना दिल्ल्लीमध्ये एनडीए सरकारसोबत येण्याची ऑफर दिली पण पवारांनी मला सांगितले की त्यांची ऑफर जरी चांगली असली तरीदेखील आपल्याला बीजेपीसोबत जायचे नाही. असा निर्णय पवारांनी त्यावेळेस घेतला होता अशी माहितीही प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिली.