BJP Suresh Dhas: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू झालेला भाजप आमदार सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. आमदार धस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राजस्थानमधून काही लोक इथे आणून माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा धस यांनी केला आहे.
सुरेश धस म्हणाले की, "मला हरणाचं मांस खोक्याने पुरवलं, असा आरोप करण्यात आला. आता माझ्यावर इतकी वाईट वेळ आलीय का? मुळात मी १६ वर्षे माळकरी राहिलेलो आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्याने मांसाहार करत असलो तरी हरणाचं मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलो नाही. पण इथं माझ्यावर हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकिटं काढून बिश्नोई समाजाची काही लोकं आणली. याने हरणाचं मांस खाल्लंय असं सांगून बिश्नोई समाजात मला व्हिलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यातून लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता," असा खळबळजनक आरोप धस यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
"मुख्यमंत्र्यांना माहिती देणार"
"माझ्या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही जात असाल तर तुमच्यासोबत मैत्री काय कामाची आहे? मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. या कटात कोण-कोण सामील होतं, याची माहिती माझ्याकडे आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे,"असंही सुरेश धस यांनी या मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपांवर आता धनंजय मुंडे यांच्याकडून काही प्रत्युत्तर देण्यात येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.