नागपूर : केवळ तीन वर्षांच्या वयात सितारमधून सरगम छेडणारे शुजात खान यांनी यशाची नवी व्याख्या निर्माण केली. विलायत खान यांचे ते सुपुत्र. मात्र, त्यांनी आपली वेगळी ओळख बनविली आहे. ते म्हणतात की जेव्हा मी स्टेजवर चढतो तेव्हा माझे कुटुंब तेथे नसते. तेव्हा मी श्रोत्यांना खुश करतो की नाही, हे महत्त्वाचे. त्यांच्याशी विकास मिश्र यांची खास बातचीत...
आपण इटावाच्या इमदाद खानी घराण्यातून आहात. या घराण्याची समृद्ध परंपरा आणि पूर्वजांबाबत काय सांगाल?माझे थोडे वेगळे मत आहे. मी घराण्याला (खानदान) जास्त महत्त्व देत नाही. कारण माझ्या घराण्यात तर सात पिढ्यांपासून हे काम होत आहे. माझे पणजोबा इटावाचे होते. नंतर ते इंदोरला गेले. माझे वडील कोलकाताला राहिले. मात्र, मंचावर माझ्यासोबत खानदान नसते. तेथे केवळ मलाच चढावे लागेल व श्राेत्यांचे मन जिंकावे लागेल.
आपले वडील विलायत खान साहेब गुरूच्या रुपात कडक होते की नॉर्मल ?त्यांच्यात माणुसकी खूप होती मात्र ते फार कडक होते. रियाजमध्ये तर त्यांना कमीजास्त चालतच नव्हते. जेव्हा आम्ही मोठे झालो आणि स्टेजवर कार्यक्रम करू लागलो तर त्यांनी कधीच आमची प्रशंसा किंवा साथ देण्याचे अथवा आमच्यासाठी कुणाला काही सांगण्याचे काम केले नाही. त्यांचे विचार असे होते की, जो हिरा आहे. त्याने स्वत:च चमकले पाहिजे. ताे चमकताेय हे दुसऱ्याने दाखविण्याची गरज पडू नये.
मी ऐकले की आपण अमेरिकेला निघून गेले होतात?-जेव्हा मी संघर्ष करीत होतो, कुणी ऐकायला तयार नव्हते तेव्हा मी पैसे कमविण्यासाठी अमेरिकेला निघून गेलो होतो. मला विलायत खानचा मुलगा समजून कुणी काम देत नव्हते. याला कामाची काय गरज, असे त्यांना वाटायचे. त्यांना हे माहीत नव्हते की माझ्याकडे काम नाही. त्रास सहन करीत आहे, खायला नाही. बेंचवर, पार्कमध्ये झोपावे लागत आहे. मात्र, बाहेर देशात सरळ हिशेब आहे. काम करा आणि पैसे घ्या. तुम्ही कोण, कुठले याच्याशी त्यांना काही देणे-घेणे नसते. त्यामुळे मी पैसे कमविण्यासाठी बाहेर जात होतो.
सिने इंडस्ट्रीतही आपण काम केले, कुणा-कुणाच्या जवळ होते?लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, आर. डी. बर्मन आणि किशोर कुमार यांच्यासोबत प्रदीर्घ वेळ राहिलो. त्यांच्या घरी त्यांचे विचार ऐकायचो, समजून घ्यायचो. किशोरदांची चंचलता खूप जवळून बघितली. मी खूप भाग्यवान आहे की केवळ बॅकग्राउंड म्युझिक वाजवतच नव्हतो तर सोबतही राहत होतो. आशा भोसले यांच्यासोबत तर माझे अलबमही आले आहेत.
गायनाचा प्रवास कसा सुरू झाला?आधी सितारचे केवळ उजवीकडून स्ट्रोक लागायचे. मात्र, त्यात गाण्याचे एक ते पाच सूर नव्हते. ही विलायत खान साहेबांची देण आहे की त्यांनी पाच सुरांचे तार छेडले. आजही अनेक जण ते करत नाहीत. शिवाय त्यांनी सितारवर गायन शैलीही अवलंबिली. त्यांनी आम्हाला शिकविले अन् समजावले. आधी ऐकायचो नंतर ते सुरात उतरवायचो. हळूहळू पुढे गेलो. मात्र, मी गायक नाही. हे लिहा की मला गाणे येत नाही. मी तसा दावाही करत नाही. हे माझे भाग्य आहे की मी जे गातो, ते लोकांना आवडते. मी आकर्षकपणे शब्दांना सूरबद्ध प्रयत्न करतो. मी सितारच परिश्रमाने वाजवतो.
शास्त्रीय संगीताचे भवितव्य कसे आहे?जे यशस्वी नाहीत, ते तक्रार करतात. कधी अंबानींना ‘ही वस्तू खूप महाग आहे’, अशी तक्रार करताना ऐकले का? तुम्ही स्वत:ला अशा ठिकाणी नेऊन ठेवा की जेथे स्नेह आणि सन्मानाने चार पैसे कमावू शकाल. कुणी शास्त्रीय संगीताचा कलावंत त्याला दीड लाख लोक ऐकायला यावेत, अशी अपेक्षा ठेवत असेल तर ते शक्य नाही. मी वाजवतो तर कुण्या शहरात हजार लोक येतात, कुठे आठ हजार येतात. ते येतात, प्रेमाने ऐकतात, यापेक्षा आणखी काय हवे ?
तुम्ही स्वत:ला अशा ठिकाणी नेऊन ठेवा की जेथे स्नेह आणि सन्मानाने चार पैसे कमावू शकाल. मी वाजवतो तर कुण्या शहरात हजार लोक येतात, कुठे आठ हजार येतात. ते येतात, प्रेमाने ऐकतात, यापेक्षा आणखी काय हवे ?
२२ मार्च रोजी सितारीचे तार अन् सरगमही छेडणार‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त १२ व्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळ्यात प्रख्यात सितार वादक शुजात खान यांचे सुफी गायन ऐकण्यासाठी शनिवारी २२ मार्च रोजी, सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात गझल व संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान गझल गायकीने रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या तलत अझीझ यांच्या गझल व ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर यांचे सुमधुर स्वर नागपूरकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत. ‘लोकमत’च्या वाचकांसाठी हा कार्यक्रम नि:शुल्क आहे. प्रवेशिका रामदासपेठ येथील लोकमत कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.