'अजितदादां’च्या गाववाल्या शेतकरी दाम्पत्याचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 08:37 PM2023-08-12T20:37:57+5:302023-08-12T20:38:20+5:30
स्वातंत्र्यदिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर होणार समारंभ
काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या काटेवाडीलगतच्या ढेकळवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याचा स्वांतत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष सन्मान होणार आहे. स्वांतत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या दोन भाग्यवान लाभार्थींमध्ये या दाम्पत्याला हा मान मिळाला आहे.
अशोक सुदाम घुले आणि मंगल सुदाम घुले असे या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे. दिल्लीत स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला येथे होणाऱ्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने विशेष अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील एक लाभार्थी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतदारसंघातील, त्यांच्या गावातील शेतकरी दाम्पत्याला हे खास आमंत्रण देण्यात आले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होत आहे. वर्षभरात साधारण ३ टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते. याचा फायदा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक औषधे, बियाणे, खते खरेदीसाठी होत आहे. ढेकळवाडी गावातील अत्यल्प भूधारक शेतकरी अशोक सुदाम घुले यांचे दीड एकर क्षेत्र आहे. त्यामुळे शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, पशुपालन सुरू केले. याकरिता त्यांनी स्वत:च्या शेतात बाजरी, सोयाबीन, मका, ऊस, आदी पिके घेतली. घुले यांचे संपूर्ण कुटुंब शेतीचा व्यवसाय करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. घुले यांना पंतप्रधान कृषी सन्मान निधीतून प्रत्येकी दोन हजार रुपयांचे चौदा हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. रक्कम जरी छोटी असली तरी या रकमेचा फायदा त्यांना खते आणि शेतीला लागणाऱ्या इतर गोष्टींसाठी झाला आहे. त्यांनी या योजनेबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
याबाबत तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती तालुक्यातील ५२ हजार ८०० लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत १४ हप्त्यांपोटी साधारण १४५ कोटी रकमेचा लाभ बारामती तालुक्यात देण्यात आला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी बारामती तालुक्यातील घुले दाम्पत्याची निवड आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे बांदल म्हणाल्या.