अमरावती : १३ व १४ डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिड्चा उल्का वर्षाव (Geminids Meteor Shower) म्हणतात. हा लघुग्रह व ३२०० फेथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूंमुळे तयार होतो. ही वस्तू धुमकेतू व लघुग्रह यामधली एक मानली जाते.
हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी व अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असताना क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपण पाहतो. या घटनेस ‘तारा तुटला’ असे म्हटले जाते; परंतु तारा कधीही तुटत नाही. ही एक खगोलीय घटना आहे व यालाच ‘उल्का वर्षाव’ म्हणतात.
उल्काचे निरीक्षण व शास्त्रीय नोंदी याची खगोल जगतात खूप गरज आहे. त्यामुळे बाह्य अवकाशातील वस्तूचे नमुने या उल्केमुळे आपणास मिळतात व यामुळे वस्तूच्या जडणघडणेचा अर्थ लावता येतो. या उल्का वर्षावाचे विलोभनीय दृश्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले आहे.
हे तर धुमकेतू, लघुग्रहाचे अवशेषजेमिनिड्स उल्का वर्षाव हा ३२०० फेथॉन नावाच्या एका छोट्या खगोलीय वस्तूमुळे होतो. ही वस्तू धूमकेतू आणि लघुग्रह यांच्यामधील एक प्रकार मानली जाते. धुमकेतू किंवा लघुग्रह सूर्याला प्रदक्षिणा मारत असताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे त्यांचे अवशेष आहेत. याबाबत काही अंधश्रद्धा असल्या तरी याला खगोलशास्त्रात कुठेही थारा नाही.