मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर केलेल्या एका ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. राजकारणातही कुस्ती असल्याचं म्हणत फडणवीसांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात अप्रत्यक्षपणे थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. राज्यातील राजकारणाबाबत संजय राऊतांनी ट्विट केले होते.
देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलंय की, राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत. पण कुस्तीमध्ये जसं डोपिंग आले. काही जण नशा करून कुस्ती खेळतात म्हणून त्यांना बाद करण्यात आले. आमच्या राजकारणातही काही लोकं सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळण्याचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानाला कुस्तीतून बादच व्हावे लागते. जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात असा टोला त्यांनी लगावला.
त्याचसोबत जनतेच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही कुस्ती जिंकली आहे. २०२४ ला आम्ही पुन्हा जिंकू असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला पुन्हा आशीर्वाद देण्याचं आवाहन केले.
संजय राऊतांनी काय ट्विट केले होते?महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण खेचाखेची, फोडाफोडी, शेवटी शरणागती...जय महाराष्ट्र असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुस्तीतील डावाचा फोटो टाकला आहे. राऊतांच्या या ट्विटनंतर फडणवीसांनी ट्विट केले आहे.
१५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारचआगामी १५ दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे. या सरकारचं 'डेथ वॉरंट' निघाले आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रत्येकजण आपापली गणिते मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील १५ ते २० दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.