गेल्या काही काळात जोडीदाराशी झालेल्या भांडणानंतर दुसऱ्या जोडीदाराने टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना मागच्या काही काळापासून सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका १८ वर्षीय तरुणाने फोनवर प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुण त्याच्या प्रेयसीसोबत बोलत होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं. हे भांडणं एवढं वाढलं की, सदर तरुण मानसिक तणावाखाली आला. त्यानंतर या तरुणाने रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये शोकाचं वातावरण पसरलं. त्यांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला.
मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र पोलिसांकडून या तरुणाच्या मृत्यूमागे अन्य कारण तर नाही ना, याचा शोध घेण्यासाठी तरुणाची कॉल डिटेल आणि इतर बाबींची माहिती घेतली जात आहे.