मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल, अजित पवार यांच्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 04:12 PM2022-12-30T16:12:13+5:302022-12-30T16:15:24+5:30
Winter Session Maharashtra: मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या बोगस भरती प्रक्रिये प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठांच्या भूमिकेची चौकशी करुन कडक कारवाई करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नागपूर - मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या बोगस भरती प्रक्रिये प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठांच्या भूमिकेची चौकशी करुन कडक कारवाई करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रालयातील शिपाई कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, फसवलेल्या तरुणांना न्याय द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती.
मंत्रालयात 'क' संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातंच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी. दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माहितीचा मुद्दा उपस्थित करुन केली होती.
त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात येईल, असे त्यांनी उत्तरादाखल सांगितले.