मित्राला पहिल्यांदा भेटण्यासाठी मुलगी हॉटेलात जात नाही; हायकोर्टाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 08:45 AM2024-09-12T08:45:16+5:302024-09-12T08:45:50+5:30
बलात्काराचा आरोप ठरविला अविश्वासार्ह, उच्च न्यायालयाला मौखिक आरोपांशिवाय इतर कोणतेही ठोस पुरावे रेकॉर्डवर आढळून आले नाही.
नागपूर - कोणतीही समजूतदार मुलगी नवीन मित्राला पहिल्यांदा भेटण्यासाठी थेट हॉटेलच्या खोलीमध्ये जात नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी व्यक्त करून एका तरुणावरील बलात्काराचा आरोप अविश्वासार्ह ठरविला.
राहूल गौतम लहासे (२६) असे आरोपी तरुणाचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने फेसबुक मैत्रिणीला पहिल्या भेटीसाठी अंजनगाव सुर्जीमधील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिला टी-शर्ट दिली. त्यानंतर मुलीचे ती टी-शर्ट घालताना फोटो काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप होता, परंतु, उच्च न्यायालयाला मौखिक आरोपांशिवाय इतर कोणतेही ठोस पुरावे रेकॉर्डवर आढळून आले नाही.
तसेच, मौखिक आरोपही अविश्वसनीय ठरले. त्यामुळे आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी अचलपूर सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली होती. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, आरोपीतर्फे मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.