विश्वासघाताच्या पायावर उभं असणारं सरकार विधीमान्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:20 PM2022-08-16T18:20:28+5:302022-08-16T18:24:35+5:30

मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितंच लेचापेचा नाही अशी घणाघाती टीका अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.

A government founded on treachery is not legitimate; Ajit Pawar's attack on CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis | विश्वासघाताच्या पायावर उभं असणारं सरकार विधीमान्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

विश्वासघाताच्या पायावर उभं असणारं सरकार विधीमान्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

Next

मुंबई - राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं राज्य सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले आहे, हे सरकार अद्याप विधीमान्य नाही अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

अजित पवार म्हणाले की, सरकारची वैधता संदिग्ध असल्याने सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे असं सांगत विरोधकांनी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. सरकारकडून विकासकांना स्थगिती देऊन राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचं काम सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूरस्थितीने हाहा:कार माजला असताना, सव्वाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असताना, राज्यातील शेतकरी मदतीअभावी आत्महत्या करत असताना, राज्य सरकारकडून सामान्य जनतेला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत मुख्यमंत्री असलेल्या दोन सदस्यीय मंत्रिमंडळाने ४० दिवसात ७५० शासननिर्णय निर्गमित केले. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवून मुख्यमंत्री म्हणून आपण, केवळ एका व्यक्तीने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे सगळे निर्णय घेतलेत. राज्याचे धोरणात्मक निर्णय केवळ एका व्यक्तीने घेण्याची कृती सामुहिक निर्णयप्रक्रियेला छेद देणारी, लोकशाही व्यवस्था, नैतिकतेचे धिंडवडे काढणारी आहे. शिंदे सरकारने सत्तास्थापनेपासून शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी, युवक या समाजघटकांबद्दल असंवेदनशीलता दाखवली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी कमी झाल्यानंतरही त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याबाबत सरकारकडून कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. ही अकार्यक्षमता, असंवेदनशीलता अक्षम्य आहे असा आरोप अजित पवारांनी केला. 

दरम्यान, दिल्ली भेटीतील ‘नीती’ आयोगाच्या बैठकीवेळचा फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो फोटो महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आहे. फोटो पाहिल्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे...?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे. मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितंच लेचापेचा नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्राचा सन्मान राखू शकले नाहीत, याचे दु:ख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा अभिमानास्पद इतिहास रचलेल्या महाराष्ट्राला हे दु:ख अधिक बोचणारं आहे. यापुढे तरी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी असा खोचक सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. 

Web Title: A government founded on treachery is not legitimate; Ajit Pawar's attack on CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.