Vinod Kambli ( Marathi News ) : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आर्थिक कारणास्तव कांबळी यांच्यावरील उपचार थांबू नयेत यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांना वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी मंगळवारी विनोद कांबळी यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती केली. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.
विनोद कांबळी यांची प्रकृती स्थिर
विनोद कांबळे यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर विवेक दिवेदी यांनी सांगितलं आहे. "मी त्यांची सगळी तपासणी केली असून त्यांचे सगळे रिपोर्ट चेक केले आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. इतर चाचण्यांपैकी त्यांचे आता एमआरआय ब्रेन करण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्यांची पुढील उपचार ठरवले जातील. शुक्रवारपर्यंत त्यांना आयसीयूमधून इतर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाईल. सगळे रिपोर्ट त्यांचे व्यवस्थित आले तर रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. सध्या मॉनिटरिंग करावे लागत असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे," अशी माहिती डॉ. दिवेदी यांनी दिली.