मुंबई : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला असून खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेगमर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत व्यक्त केले आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खाजगी प्रवासी बसने पेट घेतल्याने सुमारे २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण राष्ट्रवादी परिवार सहभागी असल्याचे सांगतानाच मृतांना जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर जखमी झालेल्या प्रवाशांना योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.