Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:39 PM2024-06-17T17:39:08+5:302024-06-17T18:02:55+5:30

Prithviraj Chavan लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी विविध प्रश्नांवर सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. 

A lesson should be learned from the Sangli loksabha verdict; Prithviraj Chavan advice to Uddhav Thackeray | Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

कराड - महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात कमी पडलो. या निकालाचं विश्लेषण करतोय. सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्याठिकाणी अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या, कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात तिकीट देऊ नये हा धडा सांगलीतून घेण्याचा आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाविकास आघाडी ज्या ताकदीनं लोकसभा निवडणूक लढली, त्यापेक्षा अधिक ताकदीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आता आम्ही १५८ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहोत. आमचा प्रयत्न १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

दरम्यान, जर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून लोकसभा अध्यक्ष ठरवला गेला तर निश्चित त्यांना पाठिंबा दिला जाईल. ही लोकशाहीची परंपरा आहे. परंतु रेटून जर काही चालवायचा प्रयत्न झाला तर आम्हालाही आमचा उमेदवार उभा करावा लागेल. दिल्लीत सभागृहाच्या समन्वयाचं काम करतायेत त्यांनी हे नियोजन केले पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले. 

...म्हणून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी 

ईव्हीएम खराब असा आरोप कुणी केला नाही. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात जी घटना घडली त्याबद्दल निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगाने FIR दाखल केला का? पराभूत उमेदवाराला FIR दिला पाहिजे. आपल्या मोबाईलवर ओटीपी येतो, त्यातून ईव्हीएम उघडलं जातं ही नवी भानगड कुठून आली? पोस्टल बॅलेट हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोळा करतात हे आम्हाला माहिती नाही. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी करून ते जाहीर करायला हवेत ते यावेळी निवडणूक आयोगाने केले नाही. त्यामुळे हा आरोप सरसकट ईव्हीएमवर नाही. मुंबई उत्तर पश्चिमबाबत जो काही गोंधळ आहे त्यावर स्पष्टीकरण द्यावे ही मागणी आमची आहे. निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे यासाठी बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी आमची मागणी आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

लोकशाही वाचवण्यासाठी NGO चा वापर

लोकशाही वाचवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. कुठलेही नेरिटिव्ह सेट करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या नाहीत. केवळ लोकशाही वाचली पाहिजे यासाठी हे झालं. मी सर्व संस्थांचे आभारी मानतो, त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहिली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असं सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी निर्भय बनोच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. 
 

Web Title: A lesson should be learned from the Sangli loksabha verdict; Prithviraj Chavan advice to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.