मुंबई - अलीकडेच किल्ले प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. सरकारकडून रातोरात या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींकडून होत असलेल्या मागणीवर सरकारने कार्यवाही केली. खानाच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामावर सरकारने बुलडोझर फिरवला. सरकारने उचललेल्या या पाऊलाचं शिवप्रेमींकडून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्याबाबत विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे असं त्यांनी उल्लेख केला.
तसेच आजही शिवभक्तांना ही घटना प्रेरित करत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट-साऊंड शो सुरू करण्याबाबत हिंदू एकता आंदोलन, सातारा व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. त्यावर संबधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागवण्यात यावा असे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना दिले आहेत.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना पोलीस बंदोबस्तअलीकडेच प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी भोवतालची अतिक्रमणे पोलिसांनी रात्रीत हटविली. त्यानंतर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून येत म्हणून जिल्ह्यातील सर्वच प्रार्थना स्थळ पोलीस बंदोबस्त दिला. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतापगड परिसरात जमावबंदी १४४ कलम लागू करण्यात आलं होतं. तसेच जिल्ह्यातील मंदिरे, मस्जिद परिसरात पोलीस तैनात करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"