मुंबई - आलिशान घराच्या स्वप्नात विलेपार्ले, साकीनाका आणि कांदिवलीतील रहिवाशांना जवळपास आठ कोटींहून अधिकचा फटका बसला आहे. याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनी, संचालक आणि विकासकांविरूद्ध गुरुवारी तीन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
गोरेगाव परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी आठवले (७३) यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी जयेश विनोद तन्ना, दीप विनोद तन्ना आणि विवेक जयेश तन्ना या तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आपली जवळपास सव्वा कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. गोरेगाव सिद्धार्थनगर येथील कपिलवस्तू को-ऑप. हौ. सोसायटी येथे ३०१ क्रमांकाचा फ्लॅट खरेदीसाठी साई सिटी डेव्हलपर्स एस्कटिक प्रायव्हेट लिमिटेड यांना चेकद्वारे पैसे पाठवले. मात्र, ठरल्याप्रमाणे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन त्यांच्या नावावर न करता, तो फ्लॅट दुसऱ्याला विक्री केल्याचे आरोपात नमूद आहे. त्या फ्लॅटवर ९८ लाख ८० हजार रुपयांचे लोन करून ती रक्कमही जयेशने घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, विलेपार्ले परिसरात राहणारे मनीष गुजराती (४३) यांची दिलीप अमृतलाल ध्रुव, शुभांग दिलीप ध्रुव यांनी सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विलेपार्ले पूर्वेकडील विघ्नेश्वर सोसायटीत ८०२ क्रमांकाच्या फ्लॅटसाठी २५ ऑक्टोबर २०१९ रोजी मेसर्स बिनिता यांनी या फ्लॅटच्या बदल्यात परिसरातील दुसऱ्या ठिकाणी, १८७० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. याबाबत वारंवार विचारणा करूनही फ्लॅट दिला नाही. पैसेही परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत जुहू तारा रोड येथील रहिवासी मनमोहन घुवालेवाला (६०) यांच्या तक्रारीवरून राजेश मधानी (५२) व त्यांची पत्नी रुपल मधानी (५०) यांच्याविरूद्ध साकीनाका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. घुवालेवाला यांच्या तक्रारीनुसार, मधानी दाम्पत्याने कांदिवलीत निवासी इमारत बांधत असल्याचे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून ५ कोटी ३३ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, डिसेंबर २०१८ ते अद्याप बांधकामही सुरू न केल्याने त्यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. मात्र, पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.