लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात अनेक खासगी व्यक्तींनी किंवा संस्थांनी रक्ताच्या चाचण्या करण्याच्या लॅबोरेटरीचे अक्षरशः दुकान मांडले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक पात्रता नसणाऱ्या व्यक्तींनी लॅबोरेटरी काढून ठेवल्या आहेत. यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याकरिता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या सर्व लॅबोरेटरी चालकांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी परिषदेने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.
रक्ताच्या चाचण्या करणाऱ्या योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या तंत्रज्ञाची नोंदणी शासकीय महाराष्ट्र पॅरामेडिकल (परावैद्यक) कौन्सिलकडे करण्यात येत असते. राज्यात महाराष्ट्र पॅरामेडिकल परिषद रक्ताच्या चाचण्या करणाऱ्या योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या तंत्रज्ञाची नोंदणी करते. या व्यवसायासाठी बनविलेले नियम सर्व तंत्रज्ञ पाळतात की नाही ते पाहणे हे या परिषदेचे काम आहे.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित परिषद येते. या परिषदेवरील सध्या प्रशासक म्हणून नेमणूक या विभागातर्फे करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला राज्यात केवळ ४९३० तंत्रज्ञांनी नोंदणी परिषदेकडे केली आहे. परिषदेकडे विविध तंत्रज्ञ नोंदणी करू शकतात.
शैक्षणिक अर्हता कोणती असावी ? पॅरामेडिकल विषयांमध्ये पदवी/पदविका उत्तीर्ण उमेदवारांच्या नोंदणीसाठी विचार करण्यात येतो. विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य विद्यापीठे, मुक्तविद्यापीठ, अभिमत विद्यापीठ आणि शासनमान्य महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, एआयसीटीई, पदवी पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारास परावैद्यक व्यवसायी व्यक्ती म्हणून महाराष्ट्र परावैद्यक परिषद नोंदणी देते.
होय, आम्ही पोलिस संचालकांना पत्र लिहून बेकायदेशीर लॅबोरेटरी टाकून बसले आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच आमचे काही नोंदणीधारक तंत्रज्ञ पैशासाठी बेकायदेशीर लॅबोरेटरी चालकास स्वतःचे नाव वापरण्याची परवानगी देतात हे अतिशय गंभीर आहे. लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे. त्याच्यावरसुद्धा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही सुद्धा मागणी पत्राद्वारे केली आहे.- सतीश नक्षीने, प्रशासकमहाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल
बेकायदेशीर लॅबोरेटरीवर कारवाई झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. मात्र, त्याचवेळी रक्त आणि लघवीचे रिपोर्ट प्रमाणित करण्याचे काम हे नोंदणीकृत पदव्युत्तर एम. डी. पॅथॉलॉजिस्टलाच आहे हे विसरता कामा नये.- डॉ. संदीप यादव, अध्यक्षमहाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायॉलॉजिस्ट