खासदार सुनिल तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व काही मलाच मिळायला हवे असे चालत नाही. मुलगी पण माझीच खेळाडू, मुलगा पण माझाच खेळाडू असे होत नाही. क्रिकेट खेळाची उदाहरणे आम्हाला देऊ नका, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे थोरवे यांनी तटकरेंना सुनावले.
आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे. मात्र, थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता असा निर्णय दिल्याने आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो. कप्तानने सर्व सहकाऱ्यांना सामावून घेतले पाहिजे आणि आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात, अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांच्यावर केली.
राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, अशी जोरदार इशारा त्यांनी यावेळी दिला. सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली आणि आमचा औरंगजेब हा सुतार वाडीत बसलाय अशी टीका केली.