मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात शासनाने सविस्तर प्रस्ताव सादर केल्यानंतर निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ संघटनांच्या कृती समितीला दिले होते. त्याअनुषंगाने एसटी प्रशासन, कामगार संघटना व शासनाच्या उच्चस्तरीय कमिटीमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये तीन ते चार बैठकांचे सत्र सुरू असून, मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
यापूर्वी एसटीतील ११ कामगार संघटनांनी एकत्र येऊन कृती समितीमार्फत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाने सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानंतर संघटनांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून योग्य प्रस्ताव तयार करण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना कोणकोणते आर्थिक लाभ देता येतील, याबाबत विचारविनिमय होणार आहे.