शरद पवार-अजित पवारांमध्ये झाली बैठक; राष्ट्रवादीत चाललंय काय?, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:13 PM2023-08-12T18:13:34+5:302023-08-12T18:26:02+5:30

अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार-शरद पवार एकत्र आले होते. परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं.

A meeting was held between Sharad Pawar and Ajit Pawar; What is going on in NCP? | शरद पवार-अजित पवारांमध्ये झाली बैठक; राष्ट्रवादीत चाललंय काय?, चर्चांना उधाण

शरद पवार-अजित पवारांमध्ये झाली बैठक; राष्ट्रवादीत चाललंय काय?, चर्चांना उधाण

googlenewsNext

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. शरद पवार आज पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे.

शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीची बातमी माध्यमांना कळाल्यानंतर उद्योगपतीच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार-शरद पवार एकत्र आले होते. परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजितदादांना साथ देत सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही दिवसांनी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण सेंटर इथं जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. एकदा नव्हे तर दोनदा ही भेट झाली होती. शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, पक्षात कुठेही फूट पडू नये यासाठी भेट झाल्याचे त्यावेळी प्रफुल पटेल यांनी माध्यमांना सांगितले होते.

मात्र भाजपासोबत मी जाणार नाही अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. मात्र अजित पवार-शरद पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. त्यात येवला येथील सभेनंतर आता शरद पवार बीडमध्ये सभा घेणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवारांची ही स्वाभिमान सभा असल्याचे म्हटलं आहे.  

Web Title: A meeting was held between Sharad Pawar and Ajit Pawar; What is going on in NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.