मुंबई - गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र सरकार स्थापन होऊन महिना होत आला तरी अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. त्यामध्ये शिंदे गटातील इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यामागील नेमकं कारण समोर आलं आहे.
३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा शिंदे गट आणि भाजपाकडून दिल्या जात आहेत. आधी ११ जुलैनंतर मग राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर, राष्टपतींच्या शपथविधीनंतर असे अनेक मुहुर्त मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिले गेले. मात्र एकाही तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही.
दरम्यान, समोर येत असलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. १ ऑगस्टला सर्वोच्च न्यायामध्ये शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिंदे गटामधील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतही सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. आमचं सरकार भक्कम आहे, आम्ही शेतकरी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहोत. आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.