पंकज लायदेधारणी (जि. अमरावती) : मेळघाटातील दुणी (ता. धारणी) गावातील एका आईने चार मुलींना जन्म दिल्याने ही प्रसूती वैद्यकीय क्षेत्रात चर्चेची ठरत आहे. सोनोग्राफीच्या अहवालानुसार जुळे दर्शविले होते. मात्र महिलेने चार मुलींना जन्म दिला.
गर्भवती असलेल्या मातेने गावातील आरोग्य उपकेंद्रात नोंद केली होती. पाचव्या महिन्यात वरुड येथे खासगी रुग्णालयात तिने सोनोग्राफी केली. त्यावेळी जुळे होणार असल्याचा अहवाल देण्यात आला. दुणीमध्ये वैद्यकीय अधिकारी किशोर राजपूत यांच्याकडूनही तिने तपासणी करून घेतली. ती धारणी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी झाली. तेथेही जुळ्यावर शिक्कामोर्तब झाले.
तज्ज्ञ म्हणतात, असे होऊ शकते...सोनोग्राफीमध्ये बरेचदा मल्टिपल प्रेग्नेंसीच्या स्थितीत एखादे बाळ दिसत नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, अशी माहिती शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्यामकुमार सिरसाम यांनी दिली. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अक्षीक्षक डॉ. आरती कुलवाल यांच्या मते, गर्भाशयाचा आकार गोल असल्यामुळे सोनोग्राफीत दोन गर्भ सहज दिसू शकतात. दोन समोर आणि दोन गर्भ मागे असल्यास मागचे दिसत नाहीत. म्हणून वेगवेगळ्या वेळी सोनाग्राफी केल्यास इतर गर्भ दिसू शकतात.
नवजात बाळ कमी दिवसाची व कमी वजनाची आहेत. त्यांची व मातेची प्रकृती सध्या ठीक आहे. अतिदक्षता कक्षात त्यांची काळजी घेतली जात आहे. - दयाराम जावरकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, धारणी